Tuesday, May 10, 2016

माय

चंद्रमोळी झोपडीत
गोजिरवाणी परी
पितृछत्र हरवलेलं
आई तेवढी घरी

भाकर तुकडा झाल्यावर
माय निघायची घरून
पुन्हा परत यायची
काबाडकष्ट करून

एक दिवस विटा गोटे
वाहत होती माय
शिडीवरून तोल गेला
मोडला तिचा पाय

बिछान्यावर खिळली तेव्हा
स्वतःवरच रागवायची
चिंता पडली होती तिला
रोजचा खर्च भागवायची

घरामध्ये नव्हता
अन्नाचा एकही कण
अन तशातच आला
दिवाळीचा सण

कोमेजलेली परी बघून
लागल्या आसवांच्या धारा
म्हणे माझ्या चिमण्या बाळा
कुठून आणू रे चारा ?

तिची ईवली लेकच मग
झाली तिची माय
म्हणे आई ! धीर सुटावा असं
घडलंय तरी काय ?

आसवे पुसली आईची
अन अशी बिलगली घट्ट
म्हणे सांग आई कधी तरी
मी केला का गं हट्ट ?

चिंता कशाला करते आई
रडणं जरा तु सोड
अगं माझं पोट तर आत्ता भरेल
फक्त एक पप्पी दे तु गोड

रिकामं आहे पोट
ह्यात काही वाद नाही
पण तुझ्या गोड मुक्याचा
पक्वान्नालाही स्वाद नाही

एकमेकींच्या मुक्याचा
भरवू एकमेकींना घास
आपलं पोट नक्की भरेल
आई मला आहे विश्वास

माय म्हणाली येरे कुशीत
माझ्या लाडक्या पाखरा
कुठून आली एवढी समज
सांगा माझ्या लेकरा ?

आसवे ओघळली ओठांवर
माय झाली मूक
अश्रूंनी तहान गेली
गेली मुका घेताच भूक.!!"